नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर या चर्चेला विराट कोहलीनेच पूर्णविराम दिला आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावरून टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती दिली आहे.
सोशल मीडियावर कोहलीने प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवेदनात लिहिले आहे की, मला केवळ भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही, तर भारतीय क्रिकेट संघाचे माझ्या क्षमतेनुसार नेतृत्व करण्याची संधी मिळाली. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून माझ्या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. हे सर्व माझ्या सहकारी खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि प्रत्येक भारतीय ज्यांनी प्रत्येक सामन्यात आमच्या विजयासाठी प्रार्थना केल्याशिवाय हे शक्य नव्हते.
🇮🇳 ❤️ pic.twitter.com/Ds7okjhj9J
— Virat Kohli (@imVkohli) September 16, 2021
सध्या वर्कलोड वाढला आहे आणि ५-६ वर्षांपासून मी नेतृत्वाची जबाबदारीही सांभाळत आहे. त्यामुळे मला आता स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा, जेणेकरून मी वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व समर्थपणे पेलू शकेन. हा निर्णय मी जवळच्या व्यक्तींशी बोलून तसेच सचिव जय शाह व अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही चर्चा केली आहे आणि मगच निर्णय घेतला असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.