उत्तर प्रदेश: पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतोय की शेतकऱ्यांना चिरडणारी ती थार कार आमची आहे. ती आमच्या नावाने नोंदणीकृत आहे. ही कार काही कार्यकर्त्यांना घेऊन कोणाला तरी आणण्यासाठी जात होती. त्यावेळी माझा मुलगा दुसऱ्या ठिकाणी होता, अशी माहिती केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी दिली आहे.
लखीमपूर येथे रविवारी झालेल्या हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनात मिश्रा यांच्या मालकीच्या एका कारसह तीन एसयूव्हीच्या ताफ्याने शेतकऱ्यांना धडक दिली. या तीन गाड्यांपैकी एक गाडी आशिष मिश्रा चालवत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. परंतु, मंत्री अजय मिश्रा आणि आशिष मिश्रा यांनी हे दावे फेटाळून लावत आपण घटनास्थळी नसल्याचा दावा केला आहे.
माझा मुलगा आशिष मिश्रा घटनास्थळी नाही तर कार्यक्रमस्थळी उपस्थित होता, तिथे हजारो लोक होते. त्याचे तिथले फोटो आणि व्हिडिओ देखील आहेत. जर तुम्हाला त्याचा कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर, लोकेशन जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सर्व काही तपासू शकता, असे मिश्रा यावेळी म्हणाले.