TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 19 मे 2021 – महाराष्ट्र राज्यात तौक्‍ते चक्रीवादळामुळे 18 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण वादळाच्या तडाख्यात जखमी झालेत. मुंबईमध्ये वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झालेत. असे असताना तौक्‍ते चक्रीवादळाचा फटका केवळ गुजरात राज्यासह महाराष्ट्र राज्यालाही बसला आहे. मग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केवळ गुजरात दौरा का? असा प्रश्न विरोधक विचारात आहेत.

महाराष्ट्र राज्यातल्या विविध ११ हजार ठिकाणी नुकसान झालंय. तर १० हजार हेक्टर शेती क्षेत्र वादळामुळे बाधित झालंय. तसेच आत्तापर्यंत १३ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलविलं आहे. या तौक्‍ते वादळाचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे.यानंतर हे चक्रीवादळ गुजरात आणि दीव किनारपट्टीला जाऊन धडकलं.

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याविषयी काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही टीका केलीय. तौक्ते चक्रीवादळ ओसरल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाचं वादळ सुरू झालंय. या दौऱ्याबाबत टीका केली जात असून राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी महाराष्ट्रालाही ‘तौक्ते’चा फटका, मग पंतप्रधानांचा भेदभाव का? असा थेट प्रश्न विचारलाय.

राष्ट्रवादीचे नवाब मलिक काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्र राज्यात तोक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेलंय. मग, महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत?. महाराष्ट्राबाबतचा हा भेदभाव का?’, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी विचारला आहे.