बुलढाणा :
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar joins Shinde group) यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता आणखी तीन खासदार ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Balasahebanchi Shivsena) पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. ठाकरे गटाचे आणखी तीन खासदार आणि आठ आमदार शिंदे गटात येणार, असा दावा खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी केला आहे.
शिंदे गटात सहभागी झालेले बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी एक मोठा दावा केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर आणखी ३ खासदार आणि ८ आमदार शंभर टक्के बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतील, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे गजानन किर्तीकर शिंदे गटात गेल्यानंतर हे खासदार-आमदार कोण, याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे.
गजानन कीर्तिकर यांच्यानंतर तीन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. आम्ही लोकांमध्ये राहणारे नेते आहोत. आणखी काही लोक आमच्या संपर्कात आहेत. काही स्थानिक अडचणी आहे, जिल्ह्यातील काही काम बाकी आहे. नेतृत्वावर प्रेम आहे, म्हणून ते तिकडे थांबलेले आहेत. निवडणुका जाहीर होतील, तसा ठाकरे गट रिकामा झालेला दिसेल, असा खळबळजनक दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला, मात्र त्यांच्याच कुटुंबात राजकीय फूट पडल्याचं चित्र दिसत आहे. कारण प्रतापरावांचे धाकटे बंधू आणि मेहकरचे माजी नगराध्यक्ष व गटनेते संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी मात्र उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे खासदाराच्या कुटुंबातच भूकंप झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात हादरे बसले आहेत.
खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक होऊन दाखवावं, अशा शब्दात जाधवांनी राऊतांना डिवचलं होतं. आम्ही १५ ते २० लाख लोकांमधून निवडून येतो. त्यांना आम्ही बांधिल आहोत. त्यांची कामं झाली नाहीत तर आम्हाला त्यांना उत्तरं द्यावी लागतात. संजय राऊत सतत टीका करतात. त्यांनी एकदा जनतेतून निवडून येऊन दाखवावं. लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. राऊतांनी कोणत्याही प्रभागातून निवडणूक लढवावी आणि नगरसेवक होऊन दाखवावं, असं आव्हान प्रतापराव जाधव यांनी दिलं होतं.