गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारण वेगवेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे विशेषतः शिवसेनेला अडचणीच्या काळातून जावं लागत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष काम केलं. (Uddhav Thackeray lead MVA govt) मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंड करत वेगळी वाट धरली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना कठीन काळातुन जात आहे.
या परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसापासून ठाकरे घराण्यातील उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव असलेले तेजस ठाकरे (Tejas Thackeray political entry) राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अधून मधून शिवसेनेच्या व्यासपीठावरही तेजस ठाकरे दिसून आले. आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस पूर्णवेळ राजकारणात आज नसले तरी कधीतरी पूर्णवेळ राजकारणात दिसण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेना अडचणीच्या काळातून जात असताना ठाकरे घराण्याचे वारस असलेले तेजस यांना राजकारणात उतरवण्यासाठी तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे.
याबद्दलचं चित्र मुंबईतील दहीहंडीमध्ये दिसून आलं. मुंबईच्या गिरगाव परिसरात दहीहंडी निमित्त शिवसेनेकडून मोठे बॅनर्स लावण्यात आले. (Banners in Dahihandi, Mumbai) त्यामध्ये यंदा तेजस ठाकरे यांचाही फोटो ठळकपणे दिसतोय. ठाकरे घराण्याच्या तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारे चार नेते या बॅनर्सवर आहेत. यामध्ये बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तर यांच्यासह तेजस ठाकरे यांचाही फोटो ‘युवा नेतृत्व’ आणि ‘युवाशक्ती’ या कॅप्शनसह लावण्यात आलाय.
त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तेजस ठाकरे शिवसेनेच्या वतीने मैदानात उतरण्याची शक्यता आहे आणि कदाचित त्याचीच वातावरण निर्मिती आतापासून तयार केली जात आहे.