रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. (Suspicious Boat Found in Harihareshwar, Raigad) या बोटींमध्ये AK 47 रायफल सापडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हायअलर्ट जारी झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. पर्यटनाच्या दृष्टीने रायगड जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे, मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगड जिल्ह्यात येत असतात.
हरिहरेश्वर या ठिकाणी AK-47 रायफल असलेली बोट मिळाल्यानंतर मुंबईमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच रायगड, मुंबईसह पुण्यामध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या मुंबईत सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रात घातपाताचं कारण असू शकत का? तसेच मुंबईत आणि स्थानिक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबईत सर्वत्र हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. वाहनांची तपासणी आणि बॉम्ब पथक यांना तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येत आहे. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
विधान परिषदेत आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनीही हा मुद्दा उपस्थित करत याबद्दल सखोल चौकशी करण्यात यावी, गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर अशा पद्धतीच्या गोष्टी होत्या त्यामुळे हा प्रकार संशयास्पद असून चौकशी करण्यात यावी असे म्हटले. माजी मंत्री, आमदार अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी देखील यासाठी विशेष पथक नेमण्यात यावे अशी मागणी केली आहे.