TOD Marathi

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस (Shinde-Fadnavis Government) यांचं नवं सरकार आलं. या नव्या सरकारची परीक्षा पहिल्याच अधिवेशनाच्या दरम्यान होणार आहे. मात्र अधिवेशनापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Leader Uddhav Thackeray) यांनी एक निर्णय घेतला आहे आणि आपल्या निशाणावर कोण असणार याबद्दल अप्रत्यक्षपणे का होईना मात्र सुतोवच केलंय.

पोहरादेवी हे बंजारा समाजाचं श्रद्धास्थान आहे आणि बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीत स्वतः उद्धव ठाकरे जाणार आहेत. त्यामुळे संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यासाठी हा सूचक इशारा आहे का? अशी देखील शक्यता आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं सांगितलं होतं. आणि या दौऱ्या दरम्यानच उद्धव ठाकरे पोहरादेवीला जाणार आहेत.

संजय राठोड महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यावेळी भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अन्य नेत्यांनी आक्रमकपणे त्यांच्या विरोध केला मात्र शिंदे-फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत आणि याच मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे.

दोन दिवसांपूर्वीच मंत्री संजय राठोड हे पोहरादेवीला दर्शनाला गेले होते. त्या ठिकाणी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. मात्र संजय राठोड शिंदे गटासोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले असून ते स्वतः पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार तर आहेतच. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे पोहरादेवीच्या दर्शनाला गेल्यानंतर एखाद्या नव्या नेत्याकडे शिवसेनेची जबाबदारी देणार का? किंवा संजय राठोड शिंदे गटासोबत गेल्यानंतर पश्चिम विदर्भात कुणाकडे नेतृत्व देणार यासंदर्भात काही बोलणार का? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निशाणावर मंत्री संजय राठोड आहेत का आणि असतील तर संजय राठोड यांच्या ठिकाणी पश्चिम विदर्भात उद्धव ठाकरे नवा नेता निवडतील का? हे देखील बघणं औत्सुकत्याचं ठरणार आहे.