मुंबई: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवरुन शिंदे-फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालायाने झटका दिला आहे. (Supreme Court Of India) मुंबईतील वॉर्ड फेरबदलाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मुंबईत २२७ वॉर्डनुसार निवडणूक घेण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
न्यायालयाच्या या निर्णयाने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. कारण, ठाकरे सरकारचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकार येताच बदलण्यात आला होता. मात्र, आता शिंदे सरकारच्या या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे (Supreme Court on BMC Election 2022).
शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Govt) अस्तित्वात येताच २०१७ मध्ये ज्या २२७ वॉर्डनुसार निवडणुका झाल्या होत्या. त्याच पद्धतीने निवडणुका घेण्याचा अध्यादेश शिंदे-फडणवीस सरकारने काढला होता. तर यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने या वॉर्ड पुनर्रचनेसंदर्भात निर्णय घेत २३६ वॉर्ड पाडत निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. सरकार येताच हा निर्णय बदलण्यात आला.
त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच याचिकेवर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरेंना दिलासा देत या निर्णयाला स्थगिती दिली आहे.