जुन्नर | जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून आजी-माजी आमदार समर्थक एकमेकांना भिडल्याचे पहायला मिळाले. आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी घेतल्या. मात्र या श्रेयवादाच्या राजकारणात गावकरी मात्र तुमच्या राजकारण आमचा दोष काय? आमचा रस्ता कोण करून देणार असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
जुन्नरच्या बेल्हे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून चांगलेच राजकारण पहायला मिळाले. यावरून अतुल बेलके आणि शरद सोनवणे यांच्यातील वाद पुन्हा समोर आल्याचे पहायला मिळाले. शरद सोनवणे यांनी घटनास्थळी येत अतुल बेनके यांच्यावर टीका करत म्हणाले की, अतुल बेनके यांनी गेल्या चार वर्षात जुन्नर तालुक्यात एकही विकास कामे केली नाहीत. बेनके यांनी फक्त खोटे श्रेय घेण्याचे काम केले. बेनके यांच्या अशा वागण्याने शिवजन्म भूमीत त्यांची लाज गेली असून कोणतीही विकास कामे त्यांनी केलेली नाहीत. मी विद्यमान आमदार असताना बेल्हे गावावरुन थेट जेजुरी असा तो रस्ता मंजूर केला होता. अष्टविनायकचे रस्ते देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मंजुरी दिली होती. त्यासाठी त्यांनी स्पेशल निधी दिला असल्याचे सोनवणे म्हणाले.
हेही वाचा” …नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात! माजी आमदाराचं वक्तव्य; म्हणाले…”
यावर आमदार अतुल बेनके यांनी प्रतिक्रिया दिली असून शरद सोनवणे यांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले आहे. तालुक्यातील काही लोकांनी दोन वर्ष रस्ता रखडवला होता. मी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन रस्त्याची नव्याने मंजुरी आणली आणि रस्त्याचे काम सुरू करायला गेलो होतो. मात्र मागच्या वेळी ज्या लोकांनी रस्ता रखडवला होता आता तीच लोक पुढे आली आहेत. भूमिपूजन झालं की कामाला सुरुवात होणार असल्याने माजी आमदारांच्या पोटात दुखू लागले आहे, त्यातूनच त्यांनी असे कृत्य केले असल्याचा टोला बेनके यांनी लगावला. जुन्नरच्या भूमीला हे शोभत नसून माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की, विकासकामांना खोडा न घालता पुढे जाण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे.