बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ‘आज पोहरादेवीची यात्रा आहे, तो मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. संपूर्ण राज्यातील बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास घडवणे फक्त शिवसेनेला शक्य आहे. हे मला माहिती आहे आणि त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करतोय.’ असं ते यावेळी म्हणाले बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांना बळ मिळणार हे निश्चित. मात्र, दुसऱ्या बाजूला संजय राठोड यांचं बळ कमी होणार हे देखील निश्चित.
सुनील महाराज हे बंजारा समाजाचे महंत आहेत, त्याच बंजारा समाजातून संजय राठोड येतात. संजय राठोड (Sanjay Rathod) हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. संजय राठोड हे शिवसेनेत होते तोपर्यंत पश्चिम विदर्भाची शिवसेनेची धुरा ही जवळपास संजय राठोड यांच्याच खांद्यावर होते 2014 ते 19 या फडणवीस सरकारच्या काळातही ते शिवसेनेकडून राज्यमंत्री होते 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आला होता. मात्र पूजा चव्हाण (Pooja Chavhan) आत्महत्या प्रकरणात त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
संजय राठोड यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर स्वतः सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी गळही घातली होती. मात्र त्यानंतर राज्यात वेगवान घडामोडी घडल्या, शिवसेनेत उभी फूट पडली. राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत संजय राठोड देखील गेले.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याची सुरुवात पोहरादेवी येथून होईल अशा बातम्या होत्या. त्यानंतर बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. पोहरादेवी वरून येणारा संदेश हा बंजारा समाजात प्रमाण मानला जातो, असं असताना महंत सुनील महाराज यांच्यासारख्या व्यक्तीने शिवसेनेत प्रवेश करणे हा संजय राठोड यांच्यासाठी निश्चितच मोठा धक्का आहे. सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राठोड यांची प्रतिक्रिया काय असेल किंवा यापुढे ते त्यांची राजकीय वाटचाल कशी सुरू ठेवतील याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे.