टिओडी मराठी, कोची, दि. 17 जुलै 2021 – देशातील विविध राज्यांमध्ये दहावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यंदा ऑनलाईन पद्धतीने आणि नाममात्र परीक्षा होऊनही काही विद्यार्थी त्यात नापास झाले आहेत. तर बहुतांश विद्यार्थी विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांना निराशेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची निराशा दूर करण्यासाठी केरळमधील एका हॉटेल व्यावसायिकाने एक ऑफर सुरु केली आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या हॉटेलमध्ये ‘फ्री स्टे’सह फ्री बिर्याणी देणार आहे, हि ऑफर राज्यभर गाजली आहे.
नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये, यासाठी कोझीकोडेतील सुधीर नावाच्या उद्योजकांनी त्यांच्या रिसॉर्टवर मोफत राहण्याची ऑफर विद्यार्थ्यांना दिली आहे.
त्यापाठोपाठ कोचीजवळच्या एका बिर्याणी हाऊसने नापास विद्यार्थ्यांसाठी मोफत बिर्याणी देणार आहे, अशी घोषणा केली आहे. केरळमध्ये नापास झालेल्या 0.53 टक्के विद्यार्थ्यांना ही ऑफर खुली आहे, असं सांगण्यात आलं आहे.
हि नापासांची कारणं :
केरळमध्ये एकूण 4 लाख 21 हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. सोपी परीक्षा व माफक प्रश्नांमुळे यंदा केरळचा निकाल 99.47 टक्के लागला. तर, 0.53 टक्के विद्यार्थी नापास झालेत. या मुलांमध्ये काही व्यंग, लर्निंग डिसॅबिलीटी किंवा इतर काही गंभीर समस्या आहेत, असं सांगण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणामुळे अनेक विद्यार्थी मुलभूत गोष्टी नीट करू शकल्या नाहीत. अनेक कुटुबांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे, असं शिक्षकांनी सांगितलं आहे.
ऑनलाईन शिक्षण ग्रामीण भागातील अनेकांपर्यंत पोहोचलेलं नाही. अनेक भागात इंटरनेट नाही, स्मार्टफोन परवडत नाहीत आणि अनेकांना ते कसे वापरायचे याचं ज्ञान नाही, हेच वास्तव लॉकडाऊनच्या काळात समोर आलं आहे.