मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी म्हटले की, सध्या राज्यात विरोधकांना कोणतेही काम नाही. विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिसतात. त्यांच्या स्वप्नातही एकनाथ शिंदे येतात. एक व्यक्ती 20 तास काम करत असल्याने विरोधकांचा डोळ्यात खुपायला लागले आहेत. राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी घटनापीठासमोर सुरू असताना सरन्यायाधीशांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र होते. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त गणेशोत्सव नव्हे तर ज्या प्रकारांनी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले. त्याची विरोधकांनी धास्ती घेतली आहे. हा माणूस दिवसातील 20 तास कसे काम करू शकतो, या गोष्टी आता डोळ्यांमध्ये खुपत आहे . ही तर फक्त सुरुवात असून ‘ पिक्चर अभी बाकी है’ असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.
राज्यामध्ये असलेले सरकार हे बहुमताचे सरकार आहे. विरोधकांना विरोधात बसून दुसऱ्या गोष्टी नाहीत. त्यांना पूर्णवेळ मुख्यमंत्री शिंदेच दिसतात. इतकंच नव्हे तर त्यांच्या स्वप्नातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असल्याचे खासदार शिंदे यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत (Uday Lalit) यांचा शनिवारी, मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांवर कौतुकाचा वर्षाव केला होता. यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) घटनापीठासमोर सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरून नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनीही शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, शिंदे फडणवीस सरकारची वैधता आणि कायदेशीरता स्वतः माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे तपासली जात असताना आणि केवळ सध्याचे राज्य सरकारच नाही तर राज्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला देखील अपात्र ठरवले जाऊ शकते अशी परिस्थिती असताना व्यासपीठावरील विसंगती उठून दिसणे साहजिकच आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेशोत्सवात सरकारच्या कामकाजाऐवजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देण्यास प्राधान्य दिल्याची टीका करण्यात येत होती. मुख्यमंत्री शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी मोजकाच वेळ पुण्यातील विकास कामांशी निगडीत बैठकीला दिला. तर, संपूर्ण दिवस हा गणेशोत्सव मंडळाच्या भेटीसाठी दिला होता. त्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात येत होती.