राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar PC in Mumbai) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका, पत्राचा घोटाळा प्रकरणावरील आरोपांवर उत्तर यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union minister Nirmala Sitharaman in Baramati) यांचा बारामती दौरा आणि मुख्यमंत्र्यांचे निर्णय अशा विविध विषयावर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींसह (PM Narendra Modi) याआधी अनेक नेते बारामतीला येऊन गेले आहेत. सुप्रिया सुळेंनी (MP Supriya Sule) देखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याचा स्वागत केलंय, असं त्यांनी म्हटलं तर मुख्यमंत्र्यांनी निर्णय स्वतः घ्यायचे असतात वाचून दाखवायचे नसतात असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर देखील टीका केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पत्राचा घोटाळा प्रकरणी शरद पवार यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती, यावर शरद पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awhad NCP) यांनी देखील भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांचा काहीही संबंध नाही, पवारांनी लक्ष घातलं नाही किंवा मध्यस्थी केली नाही असा एकही प्रकल्प महाराष्ट्रात नाही, पत्राचाळ प्रकरणी बैठक घेतली यात काही नवल नाही असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे:
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा. पण, जर आरोप खोटे ठरले तर काय कराल हेही सरकारने स्पष्ट करावं
राज्यात गुंतवणुकीच्या मुद्द्यावर राजकीय भूमिका नको
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश
277 ग्रामपंचायतीत मविआला यश
शिंदे फडणवीस सरकार विरोधात राज्यात असंतोष
कोरोना काळातील अनुदान राज्य सरकारकडून स्थगित
निर्णय बदलल्याने सरकार विरोधात जनतेच्या मनात असंतोष
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला शुभेच्छा
राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर सकारात्मक
मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिताचा विचार करावा
उद्धव ठाकरेंच्या मागणीनंतर विलंब करणे योग्य नाही
दसरा मेळाव्याबाबत वाद वाढू न देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची
दसरा मेळाव्याचा वाद सामंजस्याने सोडवावा
विरोधकांची एकजूट झाली तर देशासाठी चांगलं
देशात विरोधकांना एकत्र आणण्याचा अनेकांचा प्रयत्न
पंतप्रधान आणि अन्य नेतेही याआधी बारामतीला आलेत
देशातली स्थिती भाजपला अनुकूल नाही त्यामुळे भाजपची तयारी
निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याचं सुप्रिया सुळे यांनी स्वागत केलंय
मुख्यमंत्र्यांना घोषणा कोण लिहून देतं माहिती नाही
लिहून देणाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य चालत नाही
मुख्यमंत्री नेहमी निर्णय वाचून दाखवतात
मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्णय घेण्याची गरज
अशा विविध मुद्द्यांवर शरद पवारांनी भाष्य केलं आणि आपली मते देखील मांडली.