टिओडी मराठी, मुंबई, दि. 27 ऑगस्ट 2021 – भाजप पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे राजभवनाचे रुपांतर भाजप कार्यालयात केले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज भाजपवर केली आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्यपालांनी विधानपरिषेदत महाविकासआघाडीच्या 12 आमदारांची नियुक्ती केली तर भाजपमधील अनेकजण पक्षातून बाहेर पडतील, अशी भीती भाजपला आहे, असाही दावा नाना पटोले यांनी केला आहे.
याबाबत नाना पटोले म्हणाले, भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. हे टाळण्यासाठी राज्यपालांचा वापर सुरूय. राज्यपाल भवन आता भाजप कार्यालय झाले आहे. गेल्या काळात भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना भाजपमध्ये राहून आपण मंत्री होणार नाही, हे कळाले आहे. त्यामुळे ते फुटणार आहेत.
आठ दिवसांत आम्ही मंत्रिमंडळ बदलू, सत्तेत येऊ. पण, हे करण्यासाठी त्यांना दोन वर्षे पूर्ण होत आली. आता भाजपामध्ये खूप चलबिचल सुरू झालीय. भाजपाचे अनेक नेते, आमदार माझ्या संपर्कात आहेत. तसेच दुसऱ्याही पक्षाचे असतील. म्हणून हे बारा आमदार ज्यादिवशी या महाविकास आघाडीचे होतील, त्या दिवशी पक्ष फुटेल, याची भीती त्यांच्या मनात आहे.