सातारा: साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. साताऱ्यातील पळसावडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला ३ महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या तर डोक्याला दगडाने मारहाण केल्यामुळे त्या रक्तबंबाळही झाल्या.
मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले, या वरून राग व्यक्त करत वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वन रक्षक सानप यांना मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.