TOD Marathi

शिवसेनेच्या फुटीत आणखी भर पडणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. शिवसेनेचे 12 खासदार उद्या शिंदे गटात सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. येत्या 20 तारखेला सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध शिंदे गट यावर एक महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. यापूर्वीच शिंदे गटाने उद्धव ठाकरेंची कार्यकारिणी बरखास्त करत आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली.

जे 12 खासदार उद्या दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत असं बोललं जातंय ते 12 खासदार एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी घेतलेल्या बैठकीला ऑनलाइन माध्यमातून उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि फुटीर गटाला अजून मान्यता नाही तसेच फुटीर गट ठाकरेंची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतो? शिवसेनेच्या खासदारांबाबतचं वृत्त हे ‘कॉमेडी एक्सप्रेस सीजन 2’ आहे असं म्हणत या आरोपांचं खंडन केलं. (Sanjay Raut and Shivsena MP press conference in Delhi)

नेमकं संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणालेत, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे:

◆ उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली.

◆ खासदारांबाबतचं वृत्त म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सीजन 2.

◆ आमदार वाचवण्यासाठी भ्रम निर्माण केला जात आहे.

◆ शिंदे गटाला अजून पक्षाची मान्यताच नाही.

◆ राजन विचारे हेच शिवसेनेचे मुख्य प्रतोद.

◆ शिंदे गटाच्या बैठकीत 14 खासदार होते हे वृत्त खोटं.

◆ कोणत्या आधारावर तुमची शिवसेना असल्याचं सांगत आहात?

◆ राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

◆ स्वतःचे आमदार सांभाळण्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे.

◆ बेकायदेशीरपणे मुख्यमंत्र्यांना शपथ देण्यात आलेली आहे.

◆ वेगळ्या गटाकडून स्वतःची कातडी वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

◆ मुख्यमंत्र्यांना सारखं सारखं दिल्लीला का यावं लागतंय?

◆ शिवसेनेचं हायकमांड मुंबईत मातोश्रीवर आहे.

◆ उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करतील.

◆ शिवसेनेचा पुढचं पाऊल हे त्यांच्या छाताडावर असेल.

◆ शिंदे फडणवीस यांना अजून पर्यंत कॅबिनेट का तयार करता आलं नाही?

असे महत्त्वाचे मुद्दे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले. या पत्रकार परिषदेला संजय राऊत यांच्यासह खासदार अनिल देसाई, राजन विचारे, अरविंद सावंत, विनायक राऊत, प्रियंका चतुर्वेदी, ओमराजे निंबाळकर हे खासदार उपस्थित होते. (RAJAN VICHARE, PRIYANKA CHATURVEDI, ANIL DESAI, ARVIND SAWANT) कलाबेन डेलकर, बंडू जाधव हे देखील आमच्यासोबत आहेत आणि अन्य खासदारही आमच्या सोबत आहेत असं संजय राऊत यांनी सांगितलं. अरविंद सावंत यांनी यावेळी अरुणाचल प्रदेशचे उदाहरण देत हे प्रकरण फक्त शिवसेनेसाठी नव्हे तर देशासाठी महत्त्वाचं आहे न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि योग्य न्याय होईल, असा विश्वास व्यक्त केला.