नाशिक :
शिवसेनेचे ४० आमदार गेले, १३ खासदार गेले पण शिवसेना आणखीही तशीच आहे. मी लोकांमध्ये जातोय. शिवसेनेविषयी लोकांच्या मनात आदराची भावना आहे. नाशिकमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी भेटतायेत, सामान्य जनता भेटत आहे, सगळे आपापल्या जागेवर आहेत, चिंता करण्याची गरज नाही, थोडासा पालापाचोळा उडालाय. पण शिवसेना आणि शिवसैनिक आपल्या-आपल्या जागी आहेत, असं सांगतानाच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा लोकसभेला निवडून येऊन दाखवावं, असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी दिलं. (Sanjay Raut challanged Hemant Godse, he was on Nashik tour)
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने संजय राऊतांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. नाशिकच्या शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, बैठका घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेतलं बंड, शिंदे गटातली धुमश्चक्री, आगामी निवडणुका, तोंडावर आलेलं हिवाळी अधिवेशन यावर संजय राऊतांनी आपली रोखठोक मतं व्यक्त केली.
नांदगावपासून मालेगावपर्यंत जे कुणी आमदार गेले त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं, त्यांचं राजकीय करिअर आता संपलं. खासदार हेमंत गोडसे हे तिकडे गेल्यानंतर तर ‘प्यारे’ झाले. त्यांची राजकीय कारकीर्द आता संपुष्टात आली आहे. (Hemant Godse’s political career finished, says Sanjay Raut) त्यांनी स्वत:ची कबर स्वत: खोदली आहे, अशा शब्दात त्यांनी हेमंत गोडसे यांना लक्ष्य केलं. तर गोडसे शिंदे गटात गेले, नाशिकला लोकसभेचा चेहरा कोण? या पत्रकारांच्या प्रश्नावर “हेमंत गोडसे हे काय चेहरा आहेत का?, असं राऊत म्हणताच पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला. शिवसेनेत चेहरा वगैरे काही नाही, शिवसेना हाच चेहरा, शिवसैनिक हीच आमची ताकद… शिवसैनिकच आमदार-खासदार निवडून देतात. शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. आम्हाला चिंता नाही”, असं पुढे बोलताना राऊत म्हणाले. (Sanjay Raut addressed a PC in Nashik)
थोडासा पालापाचोळा उडून जातो, आज या गटात-उद्या त्या गटात… शिवसेनेच्या इतिहासात अनेक वादळं आली… पण शिवसेनेने ही वादळं परतावून लावली. आताही थोडीफार संघटना हलली असेल पण नाशिकमध्ये काही डॅमेज होणार नाही, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला.