तीन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगवास भोगल्यानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) काही दिवसांपूर्वी बाहेर आले आहेत. त्यातच आता राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने समन्स बजावलं आहे. बेळगाव न्यायालयात १ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश राऊत यांना देण्यात आले आहे. यानंतर संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
“मला बेळगावला बोलावणं हा कट आहे. त्यांना माझ्यावर हल्ला करायचा आहे. मला अटकही करण्याचा डाव आहे. पण, महाराष्ट्र घाबरणार नाही आणि झुकणारही नाही. मीही या सगळ्याला घाबरणार नाही. मी जाणार आणि आपली बाजू मांडणार. मात्र, बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला आणि अटकेचा कट रचला जात आहे,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. “संजय राऊत अथवा शिल्लक सेनेचे नेते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. बेळगावात एक सुनावणी प्रकरणी त्यांना बोलावलं आहे. पण, माझ्यावर हल्ला होणार आहे, अशी सहानुभूती करण्याचा एकमेव उद्योग या लोकांकडे बाकी आहे. कर्नाटक सीमाप्रश्नासाठी कित्येक लोकांनी मार खाल्ला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाळीस दिवस कर्नाटकातील तुरुंगात होते. मग, संजय राऊत का घाबरत आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार समर्थ आहे.”
कर्नाटक सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलत नाहीत? असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यावर नरेश मस्के म्हणाले, “संजय राऊत रोज सकाळी आपल्या गिरणीचा भोंगा वाजवत राज्य सरकारवर टीका करतात. याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोकळे आहेत का? संजय राऊत हे त्यांना नेमून दिलेले काम करत आहेत,” असा टोलाही नरेश मस्के यांनी लगावला.