TOD Marathi

मुंबई : शिवसेनेने हिंदूत्व सोडले, या सबबीखाली एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केले. त्यानंतर आपल्या आमदारांच्या गटाला घेऊन त्यांनी सुरत, गुवाहाटी (Guwahati) आणि गोवा अशी मोहीम केली आणि मुंबईत येऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले. परंतु अद्याप खातेवाटप झाले नाही. कोणती खाती कोणाला द्यायची यासाठी दिल्ली दौरा सुद्धा झाला, परंतु निष्कर्ष निघाला नाही. या परिस्थितीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र डागण्यात आले आहे.

एवढे आमदार असून देखील फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचा भार वाहत आहेत आणि राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजत आहेत का? त्यांनी शिंदे सरकारला खडसावले पाहिजे, अशी टीका शिवसेनेने केली. राज्यात महाविकास आघाडी (MahaVikasAghadi) सरकार असताना, राज्यात सरकार आहे की नाही? असले प्रश्न भाजपच्या लोकांना पडत होते. आता महाराष्ट्रातील तमाम जनतेला तोच प्रश्न पडला आहे. असे सामनाच्या संपादकीय मध्ये म्हटलं आहे.

शिवसेनेतील फुटीर गटाबरोबर जाऊन भाजपने पाठ लावून दिल्लीच्या साक्षीने सात फेरे घेतले. पण वाजंत्री बहु गलबला होऊनही वऱ्हाडाच्या मुखात अद्याप घास पडला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली पण 15 दिवस उलटून गेले तरी मंत्रीमंडळाचा पत्ता नाही. पुन्हा मुख्यमंत्री बंद लॅपटॉपवर परिस्थितीचे गांभीर्य समजून घेत असल्याची मजेशीर छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत, असा टोलाही शिवसेनेने सामनातून लगावला आहे.

दरम्यान शिवसेनेतून बंडखोरी करुन गेलेले नेते आणि आमदार हिंदूत्वासाठी भाजपसोबत आहेत. तेव्हा त्यांना मंत्रीपदाची किंवा कोणत्याही जड खात्याची आस नसल्याने शिंदे सरकारने आता भाजपच्या 100 हून जास्त आमदारांना मंत्रीपदे वाटून लवकर मोकळे व्हावे, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.