TOD Marathi

भाजपकडून वरळीमधील जांबोरी मैदान येथे आयाजित करण्यात आलेल्या ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा अपमान भाजपनं केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केला आहे.

सचिन अहिर यांनी ट्वीट करुन हा आरोप केला आहे. राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) सत्कार करण्यात आला, असंही सचिन अहिर यांचं मत आहे. सचिन अहिर यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘हाच का मराठी कलाकारांचा सन्मान, भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे…मराठी कलाकारांची चेष्टा…’

या प्रकरणावर भाजप नेते आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सांगितलं, ‘उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जावं. त्यांनी आपल्या पक्षाचं नाव रडकी सेना असं ठेवावं. ते स्वत: कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करत नाहीत. कार्यक्रमात कोणाचाही अपमान झालेला नाही. मराठी माणसांच्या मराठमोळ्या दीपोत्सवामध्ये बॉलिवूडमधील कलाकार देखील येत आहेत, हा मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. ‘ असाही आशिष शेलार बोलताना म्हणाले .