TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 15 ऑगस्ट 2021 – राज्य सरकारच्या पावलांवर पाऊल टाकत महापालिकेने पुणे शहरातील निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय शनिवारी घेतला आहे. त्यानुसार रविवारपासून आठवड्याचे सर्व दिवस दुकाने, शॉपिंग मॉल रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तर शंभर टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेल्या खासगी आस्थापना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मान्यता दिली.

महापालिकेकडून ५ ऑगस्ट रोजी पुणे शहरामध्ये काही अटींवर निर्बंध शिथिल केले होते. त्यानुसार शहरातील सर्व व्यवहार हे रात्री आठपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी दिली होती. परंतु राज्य सरकारने ११ ऑगस्टला निर्बंध आणखी शिथिल करण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यावर महापालिका निर्बंध आणखी शिथिल करणार का?, याकडे सर्व व्यापारी वर्गाचे लक्ष लागले होते.

आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे नवे आदेश काढले आहेत. तसेच पुणे शहरातील सर्व व्यवहार सुरळीत ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील सर्व दुकाने, शॉपिंग मॉल यांना आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहापर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिली.

तर हॉटेल, बार यांना दहापर्यंत पन्नास टक्के क्षमतेने खुले ठेवण्यास, तर २४ तास पार्सल सेवा देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय व सिनेमागृह हे बंद राहणार आहेत.

आता विवाहासाठी शंभर जणांना परवानगी –
बंदिस्त मंगल कार्यालय अथवा हॉटेलमधील विवाह सोहळ्यांना एकूण क्षमतेच्या ५० टक्के अथवा अधिक १०० नागरिकांच्या उपस्थिती परवानगी दिली आहे. खुले प्रांगण अथवा लॉनमधील लग्न सोहळ्याला एकूण क्षमतेच्या पन्नास टक्के अथवा अधिकाधिक २०० लोकांच्या उपस्थितीत परवानगी दिली आहे.

शंभर टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अशा खासगी कार्यालयांनी गर्दी टाळण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन केल्यास त्यांना २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु एका सत्रात एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के उपस्थितीची मर्यादा घातली आहे.

जिम्नॅशिअम, योगासेंटर, सलून-स्पा यांना पूर्वी आठपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यांची वेळ वाढविली असून तेही आता रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.