कोल्हापूर | हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांनी अजित पवार गटासह जात भाजपाला साथ दिली. त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी हसन मुश्रीफांनीही शरद पवारांवर टीका करत शरद पवारांनी सहानुभूती दाखवली नाही, असं म्हटलं. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
पक्षाकडून आणि पक्षातील नेत्यांकडून सहानुभूती मिळाली नाही, असा दावा हसन मुश्रीफांनी केला असल्याबाबत प्रश्न पत्रकारांनी जितेंद्र आव्हाडांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, काय करायचं साहेबांनी? साहेबांनी काय करावं अशी इच्छा आहे? सहानुभूती म्हणजे काय असते? तुमच्यासह मी उभा आहे हे सांगणं सहानुभूती नाही का? शरद पवारांनी अजून काय करावं अशी अपेक्षा आहे? असे प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केले.
हेही वाचा ” ...मला परत बोलावण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींची, सत्यजीत तांबे काँग्रेसमध्ये परतणार?”
“१८ वर्षे मंत्री असतानाही हसन मुश्रीफांनी काय केलं. १८ वर्षे मंत्री असूनसुद्धा आम्ही विकासासाठी चाललो आहोत, असं म्हणायला काही वाटत नाही. कामगार मंत्री, ग्रामीण विकास मंत्रीपद दिल्यानंतरही रडगाणं सुरू आहे”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ यांच्यातील वाद उफाळून आला आहे. काल (२५ ऑगस्ट) कोल्हापुरात झालेल्या सभेतही जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफांवर टीका केली होती. “महाराष्ट्रात आता गद्दारी दिसू लागली आहे. हे साप बिळात होते. बिळातले साप आता बाहेर पडू लागले आहेत. या सापांना ठेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे या कोल्हापुरात सर्वात प्रसिद्ध काय आहे? पायतान! या पायतानाचा उपयोग अख्या महाराष्ट्राने करावा अशी माझी इच्छा आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.