शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनामा अखेर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मंजूर करण्यात आला आहे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party’s Andheri East by-election candidate Rutuja Latke His resignation has finally been approved by the Mumbai Municipal Corporation). काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली. ती पोट निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली. त्या मुंबई महानगरपालिकेत कार्यरत होत्या, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तो राजीनामा मंजूर झाला नव्हता.
त्या संदर्भात त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांचीही भेट घेतली होती. आयुक्तांनी या प्रक्रियेला 30 दिवस लागतील असे म्हटल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने या संदर्भात एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेवर ताशेरे ओढत शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या, असा आदेश दिला होता. त्यानुसार हा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि याच निमित्ताने ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्गही मोकळा झाला आहे. थोड्याच वेळात त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज दाखल करताना ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती आहे.