नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपाच्या निशाण्यावर आहेत. राहुल गांधी यांचा काठमांडू (नेपाळ) येथील नाईट क्लबमधील व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा राहुल गांधींना घेरलं आहे. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत दिसत आहेत. यावेळी तिथे म्युझिक सुरु असून इतर लोक डान्स करताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडूमध्ये हा नाईट क्लब आहे. हा तेथील प्रसिद्ध क्लब आहे. राहुल गांधी आपल्या पत्रकार मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी सोमवारी नेपाळमध्ये पोहोचले होते.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील राहुल गांधींचा व्हिडीओ ट्वीट करत निशाणा साधला आहे. “नियमित पार्ट्या, सुट्ट्या, खासगी विदेश दौरे हे आता देशाला काही नवे नाही. एक नागरिक या नात्याने हा मुद्दा नाही, पण एक खासदार, एका राष्ट्रीय पक्षाचे कायमस्वरुपी मालक जे नेहमी इतरांना उपदेश देत असतात,” असं ते म्हणाले आहेत.
LIVE – Press Conference by Shri @rssurjewala https://t.co/KnRKJM3wSf
— AICC Communications (@AICCMedia) May 3, 2022
विशेष म्हणजे काही तासांपूर्वी काँग्रेसने विदेश दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. नरेंद्र मोदी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. “देशात संकटं असताना साहेबांना विदेश दौरे आवडतात,” अशी टीका काँग्रेसने केली होती. केंद्रीय मंत्र्यांसह भाजपचे अनेक नेते राहुल गांधींसह काँग्रेसवर तुटून पडले आहेत. त्यानंतर काँग्रेसनंही पलटवार करत लग्नाला जाणं अजून तरी गुन्हा नाही, अशी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पाकिस्तान भेटीवरूनही काँग्रेसने निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, निमंत्रण नसताना पंतप्रधान मोदी हे नवाज शरीफ यांच्यासोबत केक कापण्यासाठी पाकिस्तानला गेले होते. त्याप्रमाणे राहुल गांधी गेलेले नाहीत. पठाणकोटमध्ये काय झालं, हे आपण पाहिलं आहे. राहुल गांधी हे मित्रराष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये एका पत्रकाराच्या विवाहात सहभागी होण्यासाठी गेले आहेत.