राज्यात दोन्ही दसरा मेळाव्याबद्दल मोठ्या चर्चा सुरू असताना दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. शिवाजी पार्क मैदानासह बीकेसी मैदानावरही (BKC Ground) त्यांचे त्यांचे नेते बोलत आहेत. नुकतंच बीकेसी मैदानावर खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांचं भाषण झालं. त्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता युवराज म्हणत आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) जोरदार टीकास्त्र सोडले. जेव्हा माझ्या वडिलांची तब्येत बरोबर नव्हती तेव्हा हे लोक सोडून गेले असा आरोप आमच्यावर करण्यात येतो मात्र जेव्हा त्यांच्या वडिलांची तब्येत खराब होती तेव्हा ते बाहेर देशांमध्ये काही परिषदेसाठी गेले होते.
परिषदेसाठी उद्योगमंत्र्यांनी जाणं आवश्यक होतं मात्र उद्योग मंत्र्यांच्या सोबत पर्यावरण मंत्री तिथे गेले होते आणि पर्यावरण मंत्र्यांसोबत एक उच्चशिक्षित खासदार त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि तिथे ते पब मध्ये मजा करत होते. असा गंभीर आरोप करत जोरदार टीकास्त्र राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर सोडले आहेत.
आम्ही आमच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे क्षण पक्षासाठी दिले, जेव्हा माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा केवळ त्याचा चेहरा बघून तेव्हा पक्षात झालेल्या बंडाविरोधात सभा घेण्यासाठी आम्हाला ज्या ठिकाणी पाठवलं त्या ठिकाणी आम्ही गेलो. एवढी वर्ष दिल्यानंतर आमच्यावर गद्दार किंवा खोके असे सगळे आरोप केले जातात, मात्र ज्यांनी लहानपणापासून खोके बघितले, खोक्यांसोबतच त्यांचा जन्म झाला ते खोकेच बोलू शकतील असंही राहुल शेवाळे म्हणाले. एकंदरीत दोन्ही बाजूंनी दसरा मेळाव्यात तोफा धडाडणार आहेत आणि त्याची सुरुवात यानिमित्तामे झाली आहे.