TOD Marathi

मुंबई:

राजकीय उलथापालथ घडवत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यात सत्तांतर घडवलं. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यामुळे आता शिवसेना (Shivsena) कोणाची असा प्रश्न उपस्थित होत असून हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr Shrikant Shinde) यांना युवासेना प्रमुख करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या युवासेना प्रमुखाची जबाबदारी आदित्य ठाकरे (Yuvasena Chief Aditya Thackeray) यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. मात्र ४० आमदार घेऊन बाजुला निघालेले एकनाथ शिंदे आपल्या गटालाच खरी शिवसेना मानतात. त्यातच 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे मुळ शिवसेना कमकुवत झाली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे  संघटन मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे आधीच राज्यात दौरा करत आहेत. तर उद्धव ठाकरे देखील लवकरच राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. मात्र तिकडे युवासेनेवर हक्क सांगण्याचाही प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू झाला आहे.

एकनाथ शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav demanded Shrikant Shinde to be chief of Yuva Sena) यांनी थेट श्रीकांत शिंदे यांना युवा सेनेचे अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यात झालेल्या बैठकीत जाधव यांनी ही मागणी केली. जाधव म्हणाले की, शिवसेनेची संघटना आपण बांधली. युवासेनेच्या बाबत एक चांगला चेहरा, लोकांना आवडणारा चेहरा, युवकांमध्ये रमणारा चेहरा म्हणून श्रीकांत शिंदे यांना युवासेना प्रमुख करावं, असंही खासदार जाधव म्हणाले.

त्यांच्या या विधानामुळे आता शिंदे गटाची नजर युवासेना प्रमुखपदावर दिसत आहे. मात्र यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात पुन्हा संघर्ष पेटण्याची दाट शक्यता आहे.