TOD Marathi

औरंगाबाद:
एटीएस आणि एनआयएकडून (NIA-ATS) मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर (Office of Popular Front of India) छापेमारी करण्यात आली आहे. राज्यभरात 20 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. ज्यात औरंगाबाद, जालना आणि बीड (Aurangabad, Jalna and Beed) जिल्ह्यात सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. मात्र या कारवाईनंतर जालना आणि बीड जिल्ह्यात पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांकडून शुक्रवारी निदर्शने करण्यात आली होती. पोलिसांकडून निदर्शने करणाऱ्या पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जालना येथेही सौम्य लाठीमार करण्यात आला आहे.

एटीएस आणि एनआयएकडून (NIA-ATS) करण्यात आलेल्या कारवाईत जालना येथील अब्दुल हादी अब्दुल मोमीन (Abdul Hadi Abdul Momin) याला जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी पथकाने अब्दुल हादीला (Abdul Hadi ) सोबत आणत त्याच्या घराचीही झडती घेतली. यावेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करत अब्दुल हादी निर्दोष असल्याचे सांगत घोषणाबाजी केली. शहरातील मामा चौकात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली. त्यामुळे जालना पोलिसांनी पीएफआयच्या 30-40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.

पीएफआयच्या (PFI) विरोधात देशभरात कारवाई होत असतानाच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या विरोधात पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी बीड शहरात निदर्शने केली. जमावबंदीचा आदेश डावलून ही निदर्शने करण्यात आली. त्यामुळे बीड पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या 39 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

एटीएसने राज्यभरात पीएफआयच्या 20 जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे तर या दरम्यान औरंगाबादच्या येथील रहिवासी असलेला पीएफआयचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख नासेर शेख साबेर उर्फ नदवी (Sheikh Nasser Sheikh Saber) याला सुद्धा एटीएसने शुक्रवारी अटक केली आहे. त्याला एटीएस विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 9 दिवसांची एटीएस कोठडी सुनावली आहे. नासेर याच्यावर देशविरोधी कट रचल्याचा आरोप आहे. पीएफआयला ‘टेरर फंडिंग’ मिळाले आहे का? याचा तपास करण्यासाठी एटीएसने न्यायालयात कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने नासेरला 2 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.