टिओडी मराठी, मुंबई, दि. 18 मे 2021 – सध्या एकीकडे कोरोना संकट आणि दुसरीकडे खतांची वाढती किंमत, यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्राला पत्र लिहून सुनावले आहे. आणि म्हणालेत कि, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी एका पत्राद्वारे केली होती. आता, माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी संबंधित खात्याचे केंद्रीयमंत्री सदानंद गौडा यांना खत दरवाढीच्या विरोधात पत्र लिहिले आहे.
कोरोनामुळे सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू आहे. याचा परिणाम समाजातील अनेक घटकांवर झालाय. लॉकडाऊनमुळे शेतीमालाला उठाव नसल्याने शेतकरीही अडचणीत आहे. अशा परिस्थितीत केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात सापडलाय. त्यामुळे हे वाढवलेले खतांचे दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
इंधनाच्या वाढीव दरासोबत आता नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. हा निर्णय धक्कादायक आहे. याचे त्वरित पुनरावलोकन करणे आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.