टिओडी मराठी, मुंबई, दि. 5 ऑगस्ट 2021 – नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु झाली आहे. मात्र, सीईटी परीक्षा होणार कि नाही, हा प्रश्न पडत होता. यावर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.आता कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची सीईटी परीक्षा घेतली जाणार नाही. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता पुढील प्रवेश घेण्यासाठी तयारी केली जात आहे. मात्र, पुढील शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील शैक्षणिक वर्ष कधी सुरू करायचे? याचा निर्णय सरकार घेणार आहे.
मागील वर्षीपेक्षा यंदा बारावीमध्ये 33 हजार अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 13 लाख 962 इतकी आहे. प्रथम वर्षाचे प्रवेश बारावीच्या निकालानुसारच करण्याचा निर्णय कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत घेतला आहे, असे सामंत यांनी यावेळी सांगितले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 26 ऑगस्टपासून सीईटी घेतली जाणार आहे. एमबीए, एमसीए, आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बी. एड., एलएलबी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे.
इंजिनीयरिंगसाठी दोन सत्रात सीईटी होणार आहे. पहिले सत्र 14 सप्टेंबर तर दुसरे 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणांशी चर्चा करून सीईटीच्या अंतिम तारखा ठरविल्या जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीईटी परीक्षा या ऑनलाइन घेतल्या जाणार असून त्या घरी राहून नाही तर केंद्रावर जाऊन द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी परीक्षा केंद्रे वाढविण्याचाही विचार आहे, असे सामंत यांनी सांगितले.