टिओडी मराठी, दि. 10 ऑगस्ट 2021 – कोविड 19 लसीकरणाबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देखील हि लस घेण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी या नागरिकांनी कोविन पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. ओळखपत्र म्हणून पासपोर्ट पाहिला जाणार आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाने या बाबत एक पत्रक प्रसिध्द केलं आहे.
भारतात महानगरामध्ये अधिक प्रमाणावर परदेशी नागरिक वास्तव्य करून आहेत. शहरांची लोकसंख्या अधिक असल्याने तेथे कोविड प्रसार होण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे शहरातील सर्वांचे लसीकरण करण्यावर भर दिला जातोय. त्यात भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांची सुरक्षा ही लक्षात घेतली आहे.
या नागरिकांना संक्रमण होऊ नये, याची जशी काळजी घेतली जातेय. त्याचप्रमाणे त्यांच्यापासून अन्य कुणालाही संसर्ग होऊ नये, यासाठी लसीकरण गरजेचं आहे, असे या पत्रकात नमूद केलं आहे.
देशामध्ये १६ जानेवारी २०२१ पासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोविड १९ लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. सध्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. देशात आत्तापर्यंत ५० कोटींपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे.