टिओडी मराठी, मुंबई, दि. 2 ऑगस्ट 2021 – फ्रंट लाईन वर्करमध्ये वकिलांचाही समावेश केल्यामुळे आता वकील तसेच न्यायालयातील क्लार्कना मुंबई लोकलमधून प्रवासाची मुभा दिली आहे.
मात्र, वकील संघटनेकडे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे. त्यानंतर संघटना वकिलांना पासच्या मंजुरीसाठी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवून तिकीट विंडोवर फक्त पास दिला जाईल, दैनंदिन तिकीट मिळणार नाही, अशी माहिती उच्च न्यायालयात महाधिवक्त्यांनी दिली आहे.
यावेळी सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल उच्च न्यायालयाने केला. लस घेतल्यांना जर घरात बसावे लागत असेल, तर लसीकरणाचा उपयोग काय?, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा सरकारचा मानस आहे, असे यावेळी महाधिवक्ता म्हणाले.
सध्या चर्चगेट ते दहीसर प्रवास करायला किमान 3 तास लागतात. सर्वसामान्यांचाही गांभीर्याने विचार करावा, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावर गुरूवारपर्यंत भूमिका स्पष्ट करू, असे आश्वासन महाधिवक्त्यांनी न्यायालयामध्ये दिले आहे.