टिओडी मराठी, मुंबई, दि. 12 ऑगस्ट 2021 – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचा आवाज काढून थेट मुख्यमंत्री कार्यालयामध्ये एकाने फोन केला. तसेच अमुक एक व्यक्तीची बदली अमुक ठिकाणी करा, असे फर्मान दिले. यामुळे अधिकारीही चक्रावले आणि अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क केला असता तो बोगस कॉल असल्याचे उघड झाले. त्यानंतर गावदेवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत एक संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यास फोन आला आणि समोरचा व्यक्ती मी शरद पवार बोलतोय, असे सांगत होता. समोरून येणारा आवाज ही तसा परिचित वाटत होता. आता खुद्द शरद पवार हेच बोलत आहे, असे म्हटल्यावर अधिकाऱ्यांने सविस्तर सर्व ऐकून घेतले.
या प्रकाराने मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी बुचकळ्यात पडले. पण त्यांना काही गोष्टींत विसंगती आढळली. यामुळे खात्री करून घेण्यासाठी एका अधिकाऱ्याने सिल्व्हर ओक गाठून खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या कानावर घडलेला प्रकार टाकला. यानंतर हा प्रकार खोटा आहे, असे स्पष्ट झाल्याने गावदेवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.
हा गुन्हा आयटी कायद्यानुसार दाखल केला असून या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकानेही सुरू केलाय. या प्रकरणी त्यांनी एका संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे.