TOD Marathi

राज्यात राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होत असताना दुसरीकडे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. (CM Uddhav Thackeray took big decision) या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून विचाराधीन होता. मंत्री एकनाथ शिंदे यांनीच गेल्या वर्षी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सिडकोला (CIDCO) दिले होते. मात्र, यावरून स्थानिकांनी मोठा विरोध दर्शवल्यानंतर अखेर राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai Airport named as D. B. Patil airport) दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्याची माहिती प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे. विमानतळ प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक सर्व समाजातील लोकांना मातोश्रीवर बोलावून त्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा निर्णय जाहीर केला आहे.

“भूमिपुत्रांची इच्छा होती. ती इच्छा आज उद्धव ठाकरेंनी पूर्ण केली आहे. आम्ही अनेकदा विनंती केली होती, पत्र पाठवलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व समाजाच्या लोकांना मातोश्रीवर बोलवलं आणि तुमची जी इच्छा आहे, भावना आहेत, त्यांचा सन्मान राखून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचं निश्चित केलं”, अशा भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केल्या.