पुणे :
‘नरहर कुरुंदकर :एका विचारवंताची अपरिचित गोष्ट ‘ या साभिनय नाटयप्रयोगाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. (Narhar Kurundkar play to organize in Pune) नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आयोजित हा नाटय प्रयोग यशवंतराव चव्हाण नाटयगृह, कोथरूड, पुणे येथे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, ‘ हम लोग, पुणे ‘ यांच्या सहकार्याने होणार आहे. हा प्रयोग निःशुल्क आहे. या नाट्यप्रयोगाची संकल्पना व लेखन अजय अंबेकर (Ajay Ambekar) यांचे आहे. या नाटयप्रयोगात दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, राजीव किवळेकर, शुभंकर देशपांडे, अजय अंबेकर आणि ज्योती अंबेकर यांचा सहभाग आहे.मुंबई, औरंगाबाद, नांदेड येथील यशस्वी प्रयोगानंतर हा प्रयोग प्रथमच पुण्यात होत आहे.
नरहर कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. इतिहास, राजकारण, नाट्यशास्त्र, स्वातंत्र्यलढा, संगीत, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांवरील मुलगामी मते सडेतोडपणे मांडून नरहर कुरुंदकर यांनी अवघे विचारविश्व हादरवून सोडले होते. पुरोगामी विचाराच्या मांडणीबरोबरच अनेक साहित्यिक, सांस्कृतिक संस्था उभारणीला त्यांनी मोठे पाठबळ दिले होते. विद्यार्थी घडविणे आणि मराठवाड्यातल्या व्यक्ती आणि संस्था यांना प्रोत्साहन देण्याची मोठी कामगिरी त्यांनी त्यावेळी केली. या सर्व पैलूंची अत्यंत रंजक मांडणी या प्रयोगात करण्यात आली आहे.
अनोखे रंगमंचीय सादरीकरण
सुप्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर यांचा जीवन प्रवास व विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहेत हे प्रभावीपणे मांडणारे “नरहर कुरुंदकर – एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे एक अनोखे रंगमंचीय सादरीकरण आहे. हा कार्यक्रम म्हणजे नाटकाच्या संहितेच्या अभिवाचनाचा एक प्रकारचा अभिनव नाट्यप्रयोग आहे. नांदेड येथील प्रथितयश कलाकर हा प्रयोग सादर करतात. बांधेसूद संहिता, कल्पक रेखाचित्रे, प्रसंगांना उठाव देणारे परिणामकारक संगीत तसेच प्रकाश नियोजन आणि कलाकारांचे ‘अभ्यासोनी प्रगटावे‘ असे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. सात पुरुष, दोन महिला आणि एक बाल कलाकार हा प्रयोग सादर करतात. यात प्रसंगानुरूप वेशभूषा, रंगभूषा यासह साभिनय सादरीकरण हे कलाकार करतात.
दोन अंकी प्रयोग आणि मध्यंतराचा कालावधी वगळता दोन तास असा या प्रयोगाचा अवधी आहे. नरहर कुरुंदकर यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी त्यांचे विचार आजच्या परिस्थितही किती उपयुक्त आहेत हे या प्रयोगाने मांडले आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानच्या वतीने याचा प्रयोग सादर केला जातो.