गोंदिया | काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभेवर विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नेमणूक केली. काँग्रेस पक्षाचा आजपर्यंतचा इतिहास व अनुभव पाहता, एका विभागातच प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेता, असे दोन महत्त्वाचे पद काँग्रेसकडून दिले जात नाही. याचाच अर्थ, आता काँग्रेस पक्षातील नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पर्व संपणार आहे, असे भाकीत भाजपचे माजी आमदार आशीष देशमुख यांनी गोंदिया येथे केले.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजप आणखी मजबूत व्हावी याकरिता माझे प्रयत्न राहणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांत लवकरच काँग्रेस पक्षात एक मोठे खिंडार पडल्याचे आपल्याला पहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट हा भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भाजपसोबत आल्यामुळे नक्कीच पुढील येणाऱ्या सर्व निवडणुका, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असोत किंवा लोकसभा व विधानसभेच्या असो, त्यात भाजपचेच उमेदवार निवडून येतील. एक ओबीसी समाजाचा सर्वसामान्य घरातून आलेला माणूस आज देशाचा पंतप्रधान झाल्यामुळे ओबीसी समाजात उत्साह आहे. अशा परिस्थितीत भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ओबीसी समाज भाजपसोबत जोडला जावा, यांचे ऋणानुबंध अजून घट्ट व्हावे, त्या अनुषंगाने आपला हा दौरा असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा ” …राज्यात आणखी एक राजकीय भूकंप; राष्ट्रवादीचा बडा नेता शरद पवारांची साथ सोडणार?”
पत्रपरिषदेला महाराष्ट्र भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गीते, माजी मंत्री राजकुमार बडोले, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. येशूलाल उपराडे, लोकसभा प्रभारी विजय शिवणकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे, जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले आदी उपस्थित होते.