काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशीही ईडीने केलेली चौकशी ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून करण्यात आली आहे. गांधी कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या सूडभावनेने ही कारवाई केली जात आहे, काँग्रेस पक्ष अशा दडपशाहीला घाबरत नाही. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून भाजपने दिल्लीत काँग्रेसचे नेते, खासदार, पदाधिकारी यांच्यावर अत्याचार चालवला आहे. पण ब्रिटीश सत्तेला नामोहरम करून पळून लावणारा काँग्रेस पक्ष इंग्रजांच्या हस्तकांच्या या दडपशाहीला भीक घालणार नाही. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई म्हणजे भाजपाची उलटी गिनती सुरु झाल्याचे द्योतक असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole on Rahul Gandhi’s inquiry by ED) यांनी केला आहे.
गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. कुणाल पाटील, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे आदी उपस्थित होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, देशात अत्यंत भयानक परिस्थिती आहे. सुडाने पेटून उठलेल्या भारतीय जनता पक्षाचे सरकार दिल्लीत सत्याग्रहासाठी आलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार यांच्यावरही हल्ले करत आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (Congress Office Delhi) घुसून तेथील नेत्यांनाही मारहाण करण्यात आली. इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात आहे पंरतु काँग्रेस पक्ष बलाढ्य अशा इंग्रज सत्तेला घाबरला नाही उलट त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. तेव्हा ब्रिटिंशाविरोधात लढलो आता ब्रिटिशांच्या हस्तकांविरोधात लढत आहोत, आम्ही यांना घाबरत नाही.
राहुल गांधी आपल्या जीवाची पर्वा न करता केंद्रातील सरकारविरोधात जनतेचे प्रश्न घेऊन सातत्याने जाब विचारत आहेत. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर केंद्र सरकार व भाजपाकडे उत्तर नाही म्हणून त्यांचा आवाज दडपण्यासाठी ही कारवाई करत आहेत. केंद्र सरकारच्या या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस १७ तारखेला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करून भाजपा सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध करेल.
एका प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले की, राजभवनवर केल्या जाणाऱ्या आंदोलनातून लोकांची जनभावना राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकारला कळावी यासाठी केले जात आहे. देशात सध्या आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. केंद्रातील सरकारने सर्व मर्यादा पार केल्या असून दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घूसून काँग्रेस नेते व पत्रकारांना मारहाण केली, कलम १४४ लावले आहे. कोणत्याही कार्यालयात कलम १४४ कसे काय लागू शकते, असा प्रश्न उपस्थित करून न्यायालयाने याची दखल घेऊन चौकशी केली पाहिजे.
यावेळी काँग्रेस पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारविरोधातील काँग्रेसचे हे आंदोलन सुरुच राहणार असून शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले.