पुणे: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यालय येथे नुकत्याच झालेल्या २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनाच्या निमित्ताने महात्मा गांधी गुणगौरव पुरस्कार-२०२१ चे आयोजन पालिकेतील महापौर दालनात करण्यात आले होते. कोरोना आजाराविषयी नियमावली व इतर कारणामुळे कार्यक्रमाचे नियोजन दोन दिवस उशिरा ठेवण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड परिसरातील तसेच काही पुणे शहरातील विविध क्षेत्रात, सेवा व असामान्य काम करत असलेल्या जवळपास तीस विशिष्ट व्यक्तींचा सन्मान यावेळी शहराच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, नगरसेविका आरती चोंधे, उषा मुंडे, जागृती धर्माधिकारी फिरोज खान, सुनील साठे उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक, वैद्यकीय, पोलीस, क्रीडा, व्यवसायिक, धार्मिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल व साई सोशल स्पोर्टस फाउंडेशन यांमार्फत देण्यात आले.
यावेळी डॉ. शिरीष खेडीकर यांना एकाच वेळी दहा वेगवेगळे पेटंट रजिस्टर केल्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले. पुणे येथील हवामान खात्यात खेडीकर हे शास्त्रज्ञ म्हणून काम करत असून अगदी सहज सोप्या गोष्टी तुन विशेष व अतिशय महत्वाचे संशोधन त्यांनी केले असून त्याबाबत महापौर ढोरे यांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या सोबतच काळुराम लांडगे, लोकेश वारके, डॉ. ओंकार अनंतराव, राजू पोखर्णीकर, प्रफुल्ल कोठारी व इतर अनेकांना यावेळी विविध क्षेत्रातील महात्मा गांधी गुणगौरव पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील साठे यांनी केले तर जागृती धर्माधिकारी यांनी आभार मानले.