महाराष्ट्रात गेल्या काही दिवसान पासून झालेल्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर यानं सारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना भरीव मदत करावी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत कृषीमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) म्हणाले की ‘ राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही,
राज्यात ओल्या दुष्काळासारखी स्थिती निर्माण झालेली नाही. मात्र शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पंचनामे वस्तुनिष्ठ पद्धतीने केले जातील. आता दिवाळीच्या सुट्या लागणार आहे. एक-दोन दिवस शासकीय कर्मचारी सुटीवर असतील. मात्र १५ दिवसांच्या आत सरकारकडे नुकसानीचे आकडे येतील. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असे सत्तार यांनी स्पष्ट केले आहे
ओल्या दुष्काळासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा केली जाणार का?, या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे सत्तार यांनी टाळले आहे. मंत्रीमंडळ बैठकीत काय काय बोलावे, काय नाही हे गोपनीय ठेवावे लागते. मंत्रीमंडळाचा तो अधिकार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर चर्चा तसेच घेतलेले निर्णय सार्वजनिक केले जातील, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.