काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेतून राहुल गांधी (Rahul Gandhi in Bharat Jodo Yatra) आपल्या सहकाऱ्यांसह कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंतचा प्रवास पायी करणार आहेत. 7 नोव्हेंबर पासून 20 नोव्हेंबर पर्यंत ही यात्रा महाराष्ट्रातून प्रवास करत होती. या यात्रेदरम्यान अनेक लोक,नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी राहुल गांधी यांना भेटले. राहुल गांधी यांच्या दैनंदिन वेळापत्रकात त्यांच्यासोबत चालण्यासाठी अनेकांना वेळ मिळाला तर अनेकांना वेगवेगळ्या शिष्ट मंडळाच्या माध्यमातून त्यांना भेटता आलं.
मात्र, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत चालण्यासाठी यात्रेचे पास 20 हजार रुपयांना विकले अशा खोट्या गोष्टी सोशल मीडियावर काही ट्विटर हँडल वरून शेयर करण्यात आल्या. या अफवांविरोधात खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची बदनामी करू पाहणाऱ्या इसमांविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या लीगल सेलने (Leagal cell of MPCC filed complaint) पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. आणि भारत जोडो यात्रेची बदनामी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं म्हटलं आहे.
ज्या ट्विटर हँडल वरून राहुल गांधींसोबत चालण्यासाठी 20 हजार रुपयांचा पास लागतो अशा प्रकारचा आरोप करण्यात आला होता, त्या ट्विटर हँडलच्या स्क्रीनशॉटसह काँग्रेस पक्षाच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष एड. रवी जाधव यांनी कुलाबा पोलीस स्थानकात या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यामुळे ज्यांनी या प्रकारचे ट्विट करून पोस्ट व्हायरल केल्या होत्या, त्यांच्यावर आता काय कारवाई होते हे पाहणं औत्सुकताच ठरणार आहे.