TOD Marathi

आता न्यायालयीन कामकाजाचे होणार Live प्रक्षेपण ; ‘या’ High Court चा निर्णय

टिओडी मराठी, दि. 15 जुलै 2021 – न्यायालयीन कामकाज हे सहसा एका बंद खोलीत चालवलं जातं. मात्र, आता याच कामकाजाचं थेट प्रक्षेपण होणार आहे, असा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने घेतला आहे. देशात अशा प्रकारचा निर्णय घेणारं ते पहिलं उच्च न्यायालय ठरलंय.

गुजरात उच्च न्यायालयाने थेट प्रक्षेपणाचा हा निर्णय घेतला असून त्यासाठी काही नियमांची आखणी केली आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी नऊ महिने अगोदरपासून यासाठी चाचणी करण्यास सुरुवात झाली होती.

गुजरात उच्च न्यायालयाने 26 ऑक्टोबर 2020 रोजी प्रथम ट्रायल स्वरूपामध्ये न्यायालयीन कामकाज लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून दाखवलं आहे.

हे प्रक्षेपण यूट्युबवर 41 लाख वेळा पाहिलं गेलं आहे. तसेच या चॅनलला सबस्क्रिप्शनही केलं होतं. आता 17 जुलैपासून हे कामकाज औपचारिकरित्या लाईव्ह दाखवलं जाणार असून या प्रक्षेपणाचं उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या हस्ते होणार आहे.

लाईव्ह प्रक्षेपणामुळे अनेक फायदे होणार आहे. न्यायालयात बराच काळ इतके खटले प्रलंबित का आहेत?, हेही यातून कळू शकेल. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनीही असे लाईव्ह प्रक्षेपण करावं, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. जेणेकरून न्यायालयाचं कामकाज, त्यात येणारे किंवा येऊ शकणारे अडथळे, त्याला लागणारा वेळ याची माहिती मिळू शकेल, असे त्यांनी म्हटलं होतं.