नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाची राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. लखीमपूरमधील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं धडक दिल्याच्या घटनेवरुन शरद पवार यांनी मोदी सरकारवर टिका केली आहे.
ही घटना म्हणजे एकप्रकारे जालियानवाला बाग हत्याकांडसारखीच घटना आहे. हे सरकार मुळातच संवेदनशील नाहीये. मात्र, देशातील शेतकरी या सरकारला त्यांची जागा दाखवून देतील, असे पवार म्हणाले. पीडितांच्या नातेवाईकांना भेटायला जाणाऱ्या विरोधकांनाही सरकार अडवत आहे. या सरकारकडून लोकशाहीची हत्या सुरू आहे. पण आम्ही विरोधक शेतकऱ्यांचा सोबत आहोत, असे पवार म्हणाले.
लखीमपूरमध्ये ज्यापद्धतीनं शेतकऱ्यांवर हल्ला केला गेला त्याचा मी निषेध व्यक्त करतो. फक्त निषेध केल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांना शांती मिळणार नाही. घटलेल्या घटनेची संपूर्ण जबाबदारी भाजपा, उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारची आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्त्वाखाली सखोल चौकशी करावी, आरोपींना तातडीनं कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.