TOD Marathi

लखीमपूर: लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलं. त्यांना सीतापूर इथल्या विश्रामगृहात ठेवण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले असून सीतापूर विश्रामगृहातच तात्पुरतं जेल उभारत बंदिस्त करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खेरी इथे हिंसाचार झाला होता, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. मौर्य यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या कृषी कायदेविरोधी शेतकरी आंदोलकांवर कथितरीत्या दोन कार घुसवल्यानंतर हिंसाचार घडला. याच संतप्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी जात होत्या मात्र त्या आधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. हा नरसंहार असून, शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. त्याच सोबत देशातील अनेक मोठ्या नेत्यानी देखील आता भाजप आणि मोदी सरकारवर टिका करायला सुरू केले आहे.