मुंबई:
शिंदे साहेब मर्द आहेत, एखाद्या महिलेनं आपल्या पक्षात यावं यासाठी असले बायकी धंदे उद्धव ठाकरेंना शोभतात, शिंदे साहेब असं करणार नाहीत, अशी जळजळीत टीका शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pavaskar criticized Uddhav Thackeray on candidature of Rutuja Latke) यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होऊ नये, किंवा त्या आपल्या बाजूने याव्यात यासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केल्याचा आरोप अनिल परब आणि ठाकरे गटाच्या काही लोकांकडून करण्यात आला होता. त्यावर बोलताना किरण पावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ऋतुजा लटके (Rutuja Latke to contest Andheri east election) या मुंबई महापालिकेत लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नियमानुसार महापालिकेकडे राजीनामा दिला आहे. त्या तृतीय श्रेणीतील कर्मचारी असल्याने त्यांचा राजीनामा आयुक्तांपर्यंत न जाता विभागीय पातळीवर मंजूर होणे आवश्यक होते. मात्र पालिका आयुक्तांवर सरकारचा दबाव असल्याने लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता. (Anil Parab alleged that BMC Commissioner has pressure for not to accept resignation of Rutuja Latke)
“प्रत्येकवेळी सहानुभूती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवणं, कारणं देणं आणि त्यातून पुन्हा एकदा आपलं राजकारण प्रस्थापित करणं असा प्रयत्न सुरु आहे. मात्र एकनाथ शिंदे यांची ऋतुजा लटके यांच्याशी कोणतीही भेट झाली नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. “एखाद्या आमदाराच्या पश्चात त्याची पत्नी निवडणुकीला उभी राहत असेल तर तिला आपल्या बाजूने बोलावण्याइतकं घाणेरडं राजकारण एकनाथ शिंदे कधीच करणार नाहीत. एकनाथ शिंदे मर्द आहेत. ४० लोकांना सोबत नेलं आणि मुख्यमंत्रीपदी बसले. एखाद्या महिलेला बोलावून असले धंदे ते करणार नाहीत. उद्धव ठाकरेंना असले बायकी धंदे शोभतात”, अशी जोरदार टीकाही पावसकर यांनी केली होती.
“भाजपा आणि आम्ही सर्व निवडणुका एकत्र लढणार आहोत. लवकरच आमचा उमेदवार जाहीर करु. यासंबंधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेतील. मुरजी पटेल यांना किंवा इतर कोणाला उमेदवारी द्यायची यासंबंधी गुरुवारपर्यंत निर्णय घेतला जाईल,” अशीही माहिती यावेळी त्यांनी दिली.