मुंबई:
शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील टीका आता शिगेला पोहोचली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटाला गद्दार संबोधल जात असून त्याला शिंदे गटाकडूनही तेवढयाच ताकदीने प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंसोबत झालेल्या राजकारणाचा इशारा देत भूकंप घडवण्याचा इशारा दिला. त्याला आता आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Kedar Dighe criticizes Eknath Shinde)
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, सत्तेसाठी विश्वासघात कुणी केला? धर्मवीर सिनेमा केवळ ट्रेलर होतं. आनंद दिघेंसोबत काय राजकारण झालं याचा लवकरच खुलासा करेन. मात्र मी मुलाखत दिली तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला होता.
यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे. आनंद दिघे यांची सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली, अशा शब्दात केंदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. आनंद दिघे यांच्यासोबत राजकारण झालं होतं, तर मग तुम्ही २५ वर्षे गप्प का बसलात, सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल? असा सवालही केदार यांनी उपस्थित केला.
आनंद दिघे यांचं निधन हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झालं आहे. त्यावेळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्याच हातात होती. उद्धव ठाकरे हे २००३ मध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी विराजमान झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे कुणाविषयी खुलासा करणार? हा प्रश्न उपस्थित होतो. दिघे यांच्यासोबत राजकारण झालं असेल तर ते कोणी केलं? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.