मुंबई :
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यभरात वातावरण तापलं आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. सर्वसामान्याच्या कष्टातून मुंबईचं वैभव उभं राहिलं असून मुंबईबद्दल अशी विधान करणं शहाणपणाचं लक्षण नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. (Sharad Pawar on Statement of Governor Bhagatsingh Koshyari)
राज्यपालांबद्दल काय बोलायचं हे सागणं कठीण झालंय, याअगोदरही ज्योतिराव फुलेंबाबतही असंच वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. अशा वादग्रस्त वक्तव्यांची त्यांच्याकडून पुनरावृत्ती होत आहे. पण मुंबईचं वैभव हे मराठी माणसाच्या कष्टाने उभं राहिलंय, राज्यपालांच्या वक्तव्याच्या जास्त खोलात मी जात नाही पण त्यांची जी टोपी आहे, तीचा रंग आणि त्यांच्या अंत:करणाच्या रंगात बदल नाही वाटंत. त्यांनी अशी विधानं करणं शहाणपणाचं लक्षण नाही अशी बोचरी टीका पवारांनी केली आहे.
“गुजराती आणि राजस्थानी लोक मुंबईतून गेले तर मुंबईत पैसे राहणार नाही. तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे तीसुद्धा राहणार नाही” असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते. त्यानंतर, अनेक नेत्यांनी राज्यपालांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी देखील राज्यपालांच्या या वक्तव्याशी सहमत नसल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला मुंबई घशातंच घालायची आहे हे उघडपणे सांगितल्याबद्दल आभार असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.