टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 30 मे 2021 – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी येत्या आर्थिक वर्षासाठी सहा ट्रिलियन (6 लाख कोटी) डॉलरचा अर्थसंकल्प प्रस्तावित केलाय. या अर्थसंकल्पातून देशातील पायाभूत सुविधांची फेरउभारणी आणि चीनशी समर्थपणे स्पर्धा करण्याची क्षमता निर्माण करण्याची योजना बायडेन यांनी आखली आहे.
अमेरिकेच्या आर्थिक वर्षाला 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरुवात होते. या आर्थिक वर्षात संरक्षण क्षेत्रासाठी 715 अब्ज डॉलरची तरतूद केली आहे. हिंद प्रशांत क्षेत्रातील चीनचा विस्तारवाद रोखण्यासाठी 5.09 अब्ज डॉलर खर्च करून पायाभूत सुविधा अधिक बळकट करणार आहेत. संरक्षण दलासाठी 85 एफ-35 लढाऊ विमानेही खरेदी करणार आहेत.
अमेरिकेसाठी चीनने सर्वात मोठे दीर्घकालीन आव्हान उभं केलंय. चीनने अलिकडच्या काळामध्ये आपल्या संरक्षण दलात अधिक प्रमाणावर सुधारणा आणि आधुनिकीकरण केलं आहे. त्यामुळे अमेरिकेलाही आपल्या संरक्षण दलात अधिक प्रमाणात वाढ करणे क्रमप्राप्त झालं होतं, अशी प्रतिक्रिया पेंटॅगॉनने दिलीय. मागील आर्थिक वर्षातील तरतूदीपेक्षा यंदाच्या संरक्षण क्षेत्रात 1.6 टक्क्यांनी वाढ करण्याची मागणी केली होती.
अमेरिकेच्या या प्रस्तावात हवामान बदलांविरूद्धच्या लढाईत नव्य सामाजिक कार्यक्रम व गुंतवणूकीचा समावेश असणार आहे.
या योजनेला कॉंग्रेसची मान्यता गरजेची आहे. मात्र, रिपब्लिकन सिनेटचा सदस्य लिंडसे ग्रॅहम यांनी हा प्रस्ताव अत्यंत महागडा आहे, अशी टीका केली आहे.
या योजनेअंतर्गत, 2023 पर्यंत कर्ज जीडीपीच्या 117 टक्क्यांपर्यंत जाणार आहे, हे कर्जाचे प्रमाण दुसऱ्या महायुद्धा दरम्यानच्या कर्जाच्या प्रमाणालाही मागे टाकेल, असेही ग्रॅहम म्हणाल्या आहेत.