TOD Marathi

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आणि या विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप केले. यामध्ये सांस्कृतिक खात्याचा प्रभार सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantivar) यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर त्यांनी ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ने संभाषणाची सुरुवात करावी, असा आदेश काढला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड (NCP Leader Dr. Jitendra Awhad) चांगलेच संतापले. नमस्कार म्हटलं तर किती दिवस जेलची शिक्षा देणार आहात? असा प्रश्नच त्यांनी विचारल.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

नमस्कार

महाराष्ट्रामध्ये माणसे एकमेकांना भेटल्यानंतर ‘नमस्कार’ असे म्हणून संभाषणाला सुरुवात करतात. टेलिफोनवर बोलताना ‘हॅलो’ हा शब्द सगळ्यांच्याच तोंडात असतो. गावाकडे जाता-येता कोणी दिसलं कि आपल्या कानावर ‘राम राम’ हे शब्द पडतात. काही जण एकमेकांना भेटल्यावरती ‘जय शिवराय’ म्हणतात. काही वस्त्यांमध्ये संभाषणाची सुरुवात आणि शेवट ‘जय भीम’ ने करतात. काही जण आपल्या संभाषणाची सुरुवात ‘जय हिंद’ ने करतात. काही जण ‘जय ज्योती’ ने करतात. प्रश्न असा आहे कि, वंदे मातरम म्हणावेच लागेल. संभाषणाची सुरुवात वंदे मातरम ने करावीच लागेल हा फतवा कशासाठी आहे. या फतव्यातून तुम्ही काय साधू इच्छिता. आजच्याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. ते पारतंत्र्याच्या जोखाड्यातून मोकळा श्वास घेण्यासाठी. त्या स्वातंत्र्यानंतर आपण संविधान स्विकारलं आणि त्या संविधानात भाषा स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असे दोन्ही हक्क अबाधित ठेवण्यात आले. हे हक्क हिरावून घेणारे तुम्ही कोण ?

जय हिंद म्हणायचे असेल मला तुमची परवानगी लागणार आहे का?
ती देणार आहात का ? किंवा नमस्कार करुन कोणाला संभाषणाची सुरुवात करायची असेल तर तुम्हांला परवानगी मागावी लागेल का ? त्यासाठी काही लायसन्स मिळणार आहे का ? जोरजबरदस्तीचे राजकारण हे अशा पद्धतीने तुम्ही राबवू शकणार नाही. शब्दांमध्ये भावना असतात. भावनांमध्ये प्रेम असते, आदर असतो. तो कुठल्या भाषेतून आणि कुठल्या शब्दातून व्यक्त करावा हे त्या माणसाचे स्वातंत्र्य असते. ते तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही.

मी तुम्हांला नमस्कार करेन. संभाषणाची सुरुवात करताना तसेच संभाषण संपवून उठताना जय भीम करेन. तुम्हांला याचा राग येणार आहे का ? मला स्पष्टपणाने सांगायचे आहे कि अशी जबरदस्ती कोणीच सहन करणार नाही. संभाषणाची आणि संवादाची सुरुवात कशी करायची आणि त्याचा शेवट कसा करायचा हे प्रत्येक माणसाची भाषा बोलण्याच्या अधिकाराचा प्रश्न आहे. तेव्हा आम्ही काय म्हणावं हे तुम्ही आम्हांला सांगू शकत नाही. आणि तुमचे आम्ही ऐकणारही नाही.

एवढेच सांगा, कि नमस्कार म्हटल्यावर किती दिवस जेलची शिक्षा देणार आहात.