टिओडी मराठी, दि. 14 जुलै 2021 – नागरिकांची असहमती दडपण्यासाठी कोणत्याही कायद्याचा दुरुपयोग केला जाऊ नये, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांनी व्यक्त केलं आहे. भारत आणि अमेरिका या दोन देशांतील कायदेशीर संबंधांवर आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.
दहशतवादविरोधी कायद्यासह अन्य कोणत्याही कायद्याचा वापर हा नागरिकांचा असंतोष दडपण्यासाठी केला जाऊ नये, असे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हंटलं आहे. देशविघातक कारवाया करणाऱ्यांविरोधात वापरण्यात येणाऱ्या युएपीए कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे, अशी टीका सध्या देशातील काही मंडळींनी सुरू केलीय.
एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेल्या स्टॅन स्वामी यांच्याविरोधातही याच कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. स्वामी हे बरेच आजारी होते व आजारपणाच्या कारणामुळे त्यांनी आपल्याला जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज केले होते. जामिनासाठी धडपड सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
आसाममध्ये अखिल गोगोई यांना नागरिकत्व कायद्याचा विरोध केल्याप्रकरणी अटक केली होती. गोगोई यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी युएपीए कायद्याविरोधात आवाज उठवणार आहे, असं सांगितलं आहे.
दहशतवादाच्या आरोपाखाली अटकेमध्ये असलेला कश्मीरचा एक माणूस 11 वर्षानंतर निर्दोष सुटला. त्याच्या सुटकेनंतरही दहशतवाद विरोधी कायद्याचा गैरवापर केला जात आहे, टीका होऊ लागली होती.