टिओडी मराठी, मुंबई, दि. 2 जुलै 2021 – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुरुवारी कारवाई करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झटका दिला आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्त केला आहे. यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीय. यात आता रोहित पवार यांच्या कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीची चौकशी करा, अशी मागणी भाजपकडून केली आहे.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिलावात ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने खरेदी केला. या कंपनीने हा कारखाना लगेच जरंडेश्वर शुगर्स या कंपनीला भाडेतत्त्वावर दिला. या कंपनीत ‘स्पार्क लिंग सॉईल प्रा. लिमिटेड’ या कंपनीचा हिस्सा आहे.
स्पार्क लिंग कंपनी ही अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे, असे ‘ईडी’चे म्हणणे आहे. ईडीच्या या कारवाईचे स्वागत करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोहित पवार यांच्या कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीमध्ये घोटाळा झाला आहे, असा आरोप करून या खरेदी व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंबियांनी अनेक साखर कारखान्यांच्या व्यवहारांमध्ये घोटाळा केला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केलाय.
कन्नड सहकारी साखर कारखाना ज्या पद्धतीने राज्य सरकारी बँकेच्या लिलावात मॅन्युप्युलेशन करुन गडबड करुन ५० कोटी रुपयांना रोहित पवार यांनी विकत घेतला आहे. याचा देखील तपास व्हायला हवा.
या व्यवहारांची चौकशी व्हावी. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा यात मोठा तोटा झाला, असा दावाही सोमय्या यांनी केला आहे.