टिओडी मराठी, दि. 13 जून 2021 – आंतरराज्य चंदनतस्कर टोळीला 650 किलो चंदनासह गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या टोळीच्या ताब्यातून सुमारे 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
अब्दुल मोहम्मद निसाद (वय 32, रा. अंजामैल हाऊस, ता. बैदाडका, जि. कासारगुड, केरळ) आणि अब्दुल फक्रुद्दीन रहमान (वय 41, रा. अमितकला हाऊस, ता. ऐनमाकजा, जि. कासारगुड, केरळ) अशी पकडलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
केरळ राज्यातील चंदनतस्कर टोळी राहुरी हद्दीतून मध्यप्रदेश येथे चोरीचे चंदन घेऊन जाणार आहे, अशी खबर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी राहुरी कारखाना येथे पथकासह सापळा लावला.
यावेळी पोलिसांनी आयशर टेम्पो अडवला असता या टेम्पोत अंदाजे 61 लाख रुपये किमतीचे चंदन (650 किलो) आणि 10 लाखांचे वाहन असा एकूण 71 लाखांचा मुद्देमाल आढळला असून तो जप्त केला आहे.
तसेच आरोपी अब्दुल मोहम्मद निसाद व अब्दुल फक्रुद्दीन रहमान यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय.